
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आटपाडी तालुक्यात मान्यवरांच्या भेटी घेत जगदाळे सरांचा प्रचार केला.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार तथा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री. खंडेराव जगदाळे (सर) यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आटपाडी तालुका पिंजून काढला.
सर्वप्रथम आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे सर्वेसर्वा व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्री. अमरसिंह देशमुख (बापूसाहेब) यांची भेट घेतली. जिल्हा सचिव प्रमोद पाटील यांनी जगदाळे सरांचा २५ वर्षांचा संघर्ष आणि अनवाणी पायांनी सुरू असलेले चळवळीतील कार्य मांडले. बापूसाहेबांनी प्रचाराचे माहिती पत्रक शांतपणे वाचले आणि सुमारे ४० मिनिटे निवडणूक व शैक्षणिक क्षेत्रातील समस्यांवर चर्चा केली.
त्यानंतर जय भवानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. रावसाहेब पाटील यांची भेट घेण्यात आली. TET सक्ती, पवित्र पोर्टल भरती, वेतनेतर अनुदान, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा बोजा अशा विषयांवर सुमारे अर्धा तास सखोल चर्चा झाली. दोन्ही मान्यवरांनी जगदाळे सरांना आशीर्वाद दिले.